ठाणे - संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोणी आपले वडील गमावले, कोणी आई तर कोणी आपले कुटुंब गमावले. पण या जगात असेही लोक आहेत की जे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या घरी परतत आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहे. अनेकांनी कोरोनाचं हे महाभयंकर युद्ध जिंकलं आहे. अशीच एक सकारात्मक घटना आता समोर आली आहे. एका 93 वर्षीय आजींनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.
डोंबिवलीच्या 93 वर्षांच्या आजींनी या कोरोना व्हायरसवर (Corona Virus) यशस्वीरित्या मात केली आहे. सुंदरबाई भोईर (Sundarbai Bhoir) असं या आजीचं नाव असून त्या उपचारानंतर आता बऱ्या झाल्या आहेत. डोंबिवलीतील एका रुग्णालयात तब्बल 14 दिवस त्यांनी कोरोनाशी लढा दिला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या आनंदाने आपल्या घरी परतल्या आहे आणि त्यांची दैनंदिन कामं करू लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबाई यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सर्व भोईर कुटुंब हे चिंतेत होतं.
सुंदरबाई यांची ऑक्सिजन लेव्हल ही 70 टक्के खाली आली होती. तसेच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं होतं. मात्र तरी देखील आजींनी कोरोनावर मात केली आहे. भोईर कुटुंबाने डॉक्टरांचे मनापासून आभार मानले आहेत. तर डॉक्टरांनी सुंदरबाई यांना जेव्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. 12 दिवस त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये उच्च ऑक्सिजन प्रवाहावर ठेवण्यात आलं. तसेच त्यांच्या फुफ्फुसातही मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं होतं. मात्र आम्ही केलेल्या उपचारामुळे आणि प्रयत्नांमुळे त्या ठीक झाल्या याचा आनंद असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या लढ्यात Ola ने उचललं मोठं पाऊल; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators
ऑनलाईन कॅब (Online Cab) सर्व्हिस देणारी कंपनी ओलाने (Ola) मोठं पाऊल उचललं आहे. Ola ने गरजूंना मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स (oxygen concentrators) देण्याची घोषणा केली आहे. कंपनी ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवेल, त्यासाठीही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ओला अॅपवर काही बेसिक डिटेल्स देऊन, घरी मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स मागवता येऊ शकतात. एकदा डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर ओला तुमच्या घरापर्यंत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स पोहोचवणार आहे. ओला फाऊंडेशनने गिव्ह इंडियासह भागीदारी करत मोफत ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स देण्याचं सांगितलं आहे. हे सर्व ओला मोबाईल अॅपद्वारे शक्य होईल. ओला यासाठी युजर्सकडून कंन्सट्रेटर्ससाठी कोणतेही पैसे घेणार नाही. कंपनी दिलेला ऑक्सिजन कंन्सट्रेटर्स त्याची गरज संपल्यानंतर पुन्हा घेऊन जाणार आहे.