- अनिकेत घमंडी डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्चअखेरीस देशभरात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून बंद पडलेल्या कंपन्या कशाबशा नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी चिंता उद्योजकांना सतावत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे कारखानदार, उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वच घटकांचे झालेले आर्थिक नुकसान विचारात घेता पुन्हा लॉकडाऊन नको, अशी ठाम भूमिका कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधीच उद्योजकांना मालमत्ता जप्तीसंदर्भात नोटीस पाठविली आहे. त्यामुळे कराची रक्कम भरण्यासाठी त्यांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. व्यवसाय तोट्यात आला आहे. कामधंदा काही नाही, पण खर्च अमाप असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काय करावे सुचत नाही. त्यातच पुन्हा लॉकडाऊन केले, तर आम्ही आधीच कर्जबाजारी आहोत, त्यात आणखी समस्येत जाऊ, असे ते म्हणाले. त्यामुळे लॉकडाऊन होऊ नये, अशा भूमिकेत कामा संघटना आहे. त्यानंतरही लॉकडाऊन केल्यास त्याला तीव्र विरोध होईल, असे ते म्हणाले. अजूनही कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत, कामगार पूर्णपणे आलेले नाहीत. लॉकडाऊननंतर कच्चा माल महागला आहे. त्यामुळे वाढीव दराने हा माल उद्योजकांना विकत घ्यावा लागत आहे. मजूर महागला आहे. असे असतानाही बाजारात तयार मालाला मागणी नाही. अनेक कंपन्यांची माल उत्पादित करण्याची क्षमता असली तरी मागणी नसल्याने पुरवठा नाही. असे असताना कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे, अशा अनेक संकटांना उद्योजकांना सध्या सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यावर महापालिका, एमआयडीसी, उद्योग मंत्रालय बोलायला तयार नाही. आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत; पण वर्षभरात दिलासा देणारे एकही पाऊल पुढे पडलेले नाही, अशी खंत सोनी यांनी व्यक्त केली. पुन्हा टॉपअप कर्ज कोण देणार?केंद्र सरकारने उद्योजकांना टॉपअप कर्ज दिले; परंतु ज्यांच्या कंपन्याचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत आहेत, त्यांना त्याचा खरा लाभ मिळाला. खासगी बँकेतील खातेधारकाला काहीच मिळाले नाही. आता पुन्हा कोण टॉपअप कर्ज देईल, असा सवाल सोनी यांनी केला. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता लॉकडाऊन परवडणारे नाही, असे सोनी ठामपणे म्हणाले.
Coronavirus : लॉकडाऊनला कामा संघटनेचा विरोध, कारखानदार आणखी गाळात जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:09 AM