कल्याण: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याणडोंबिवली महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदार व व्यापाऱ्यांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीतच दुकानं सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. गुरुवारपासून हे निर्बंध लागू करण्यात येतील हे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते.
यानुसार, कल्याणातील बहुसंख्य व्यापाऱ्यांनी या आदेशाचे पालन करत सात वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या. असे असले तरी डोंबिवली मध्ये मात्र सात वाजून गेले तरी काही व्यापाऱ्यांनी दुकानं सुरूच ठेवल्याचे चित्र दिसून आले. मात्र पावने आठच्या सुमारास येथील बहुतांश दुकाने बंद झाली होती.
कल्याण शहरात पालिकेची पथके आणि पोलीस प्रशासन लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे योग्यरितीने पालन केले जात आहे की नाही याची पाहाणी करत होते. कल्याणातील काही मोजक्या दुकानदारांनी आपले दुकान बंद केले नव्हते. पालिकेची पथके नजरेस पडताच या दुकानदारांनीही शटर डाऊन केले.
डोंबिवली शहरात फडके रोड, केळकर रोड, गुप्ते रोड, इंदिरा चौक व मानपाडा रस्ता आदी परीसरातील बहुतांश दुकानांमधील व्यवहार सुरूच होते. मात्र, पावने आठच्या सुमारास येथील बहुतांश दुकाने बंद झाली होती.