कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. मनपाची रुग्णालये, चाचणी केंद्रे, तसेच खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी मनपाने चाचण्यांवर भर दिला आहे. मनपाने याव्यतिरिक्त बस डेपो आणि कल्याण रेल्वेस्थानकातही चाचणी केंद्र सुरू ठेवले आहे. कोरोनाचे निदान लवकर झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. त्यामुळेच चाचण्या वाढविण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. मनपा हद्दीत दररोज पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २३ टक्के आहे. हे प्रमाण १० टक्क्यांच्या आत असायला हवे. कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा ४३ दिवसांवर आला आहे. डॉ. रजनीकांत देसाई म्हणाले, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जातात. घरी जाऊन चाचणी केल्यास ७०० रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे हे दर परवडणारे आहेत.‘लस तातडीने उपलब्ध करून द्या’राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार रिक्षा, टॅक्सी आणि बसचालकांनी १० एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची आहे. १५ दिवसांची वैधता ठरविली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांतील कामगारांनाही आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. ही चाचणी करून घेण्याची जबाबदारी दुकानमालकाची आहे; अन्यथा त्यांचे दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल.मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा ५०० रुपयांचा खर्च परवडणार नसल्याने या सगळ्य़ांना कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी दुकानदार व रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
CoronaVirus News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत दररोज पाच हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:54 AM