मयुरी चव्हाण
डोंबिवली - कल्याण पश्चिमेकडील वाडेघर डम्पिंग ग्राऊंड केडीएमसी प्रशासनाने बंद केलं. मात्र दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग अजूनही दिसून येत आहेत. इतकंच नाही तर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहात कचऱ्याच्या पिशव्या ठेवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. येथील चित्र नजरेस पडल्यावर नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणारी पालिका प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे धडे द्यायला विसरली की काय? असा सवाल तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील लोकमतच्या हाती लागला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे पालिकेचे कोविड सेंटर आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने काही कोविड सेंटर बंद करण्यात आली असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे कोविड सेंटर आजही सुरू आहे. येथील स्वच्छतागृह पाहून सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडेल की ही परिस्थिती नेमकी कुठली आहे? मात्र हे चित्र आपल्याच डोंबिवलीतील आपल्याच पालिकेतील कोविड सेंटरमधील आहे. येथील स्वच्छतागृहात चक्क कचऱ्याच्या बॅगा ठेवण्यात आल्यात. इतकंच नाही तर स्वच्छतागृहाची अवस्था इतकी भयंकर आहे की याची कधी साफसफाई होते की नाही? हाच प्रश्न आहे. कोरोनां काळात वैयक्तिक स्वच्छतेवर देखील भर देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. कोरोनाची लागण झाली की रुग्ण काहीसा खचलेला असतो. अशात आजूबाजूचे वातावरण प्रसन्न आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र सावळाराम क्रीडासंकुलातील स्वच्छतागृहाची अवस्था पाहून आम्ही इथून कधी एकदाच जातो असे येथील काही रुग्णांनी खासगीत लोकमतशी बोलताना सांगितलं.
सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची चर्चा राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. याच कारण म्हणजे कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी, भारत सरकारतर्फे "वाराणसी आणि कल्याण डोंबिवली " शहराला सन्मानित करण्यात आलं आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. तर दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील डम्पिंग ग्राऊंड सुद्धा बंद झालाय. डम्पिंग बंद झालं असलं तरी शहरातील स्वच्छतेवर भर देणही आवश्यक झाल आहे. सर्वात आधी प्रशासनानं आपली कार्यालय... आरोग्य केंद्र, व रुग्णालय यांची देखील स्वच्छता योग्य प्रकारे होते की नाही हे देखील तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.