कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नवीन कोरोना रुग्णांची संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी काही नागरिकांकडून कोरोनाचे नियम डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि पोलीसदेखील पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
रविवारी दिवसभरात मास्क न परिधान करणा-यांकडून केडीएमसीने एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. सबळ कारणाशिवाय जो नागरिक रस्त्यावर फिरेल त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येईल, असे सुद्धा आदेश देण्यात आले होते. रविवारी दिवसभरात सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या 264 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली होती. यापैकी एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एकूण 15 दुकाने सीलबंद करण्यात आली असून त्यांच्याकडून 35 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 1 लाख 30 हजार इतका दंड वसूल केला आहे.