- प्रशांत मानेकल्याण : सद्य:स्थितीला कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी इतर रुग्णांबरोबरच थॅलेसिमियाग्रस्त मुलांच्या रक्ताचीही तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही ‘रक्तदान’ करा, असे आवाहन सर्वांना केले आहे. कल्याण डोंबिवलीतील रक्तपेढ्यांमधील आढावा घेता आवश्यक तेवढाच साठा असल्याचा दावा केडीएमसीने केला असला तरी कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावात रुग्णांसाठी प्लाझ्मा मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची फरपट सुरू असल्याचे चित्र आहे.कल्याण-डोंबिवलीत पाच रक्तपेढ्या आहेत. यात कल्याणमधील संकल्प ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक तर डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लड बँक, चिदानंद ब्लड बँक, ईश्वर सेवा ट्रस्ट ऑफ डोंबिवली ब्लड सेंटर या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रक्तपेढ्यांवर केडीएमसीचे नियंत्रण असून, त्यासाठी महापालिकेचे सचिव संजय जाधव यांची नेमणूक केली आहे. ३० मार्चपासून ते आजतागायत त्यांच्याकडून संबंधित रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याचा आढावा घेतला जात आहे. सद्य:स्थितीला इतरत्र निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यावर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कल्याण डोंबिवलीत आवश्यक तेवढा रक्तसाठा असल्याचा दावा केला.प्लाझ्मा मिळविण्यासाठी कसरतकोरोनाचे रुग्ण बरे करण्यासाठी विविध प्रकारची औषध आणि इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून सुरू असताना प्लाझ्मा थेरपी कोरोनावर अत्यंत उपायकारक ठरत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्माथेरपी एक प्रयोगात्मक प्रक्रिया आहे. या उपचारपद्धतीत कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा काढून तो कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णास दिला जातो. यामुळे रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो. दरम्यान, सद्य:स्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेला प्रादुर्भाव पाहता उपचारासाठी दाखल असलेल्या बहुतांश रुग्णांना प्लाझ्मा द्यावा लागत आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना तर दोन ते तीन प्लाझ्मा दिले जात आहेत. एकीकडे तो खर्चिक असलातरी कोरोनातून बरे झालेल्याचा प्लाझ्मा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्लाझ्मादानासाठी कोरोनातून बरे झालेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन केडीएमसीने केले आहे.
CoronaVirus News: रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक तेवढा रक्तसाठा; केडीएमसीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 12:48 AM