कल्याण - त्याची कोविड टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्याला लंग्ज इन्फेक्शन १०० टक्के, ऑक्सीजन लेव्हल ६० आणि त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह, ह्रदविकार या सहव्याधी. त्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याचा भाऊ वणवण फिरत होता. त्याला व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नव्हता. त्याच्या भावाने अखेरीस पोलिसांना फोन केला. तेव्हा पोलिसांच्या मदतीने त्याला बेड मिळाला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याला जीवदान मिळाले ते केवळ खाकीतल्या माणूसकीमुळे. त्याने पोलिसांच्या या कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे सांगताना त्याच्यासह त्याच्या भावाचे डोळे पाणावले होते.दीपक पाटील हे कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी परिसरात राहतात. त्ये व्यवसायिक आहेत. त्यांचा भाऊ कैलास याला कोरोना झाला. त्याची सिटीस्कॅन केल्यावर त्याचे लंग्समध्ये १०० टक्के इन्फेक्शन होते. तसेच त्याची ऑक्सीजन लेव्हल ६० इतकी कमी झाली होती. त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह आणि ह्रदयविकार हे सहव्याधीह होते. ७ एप्रिल रोजी दीपक हे भावाला बेड मिळावा यासाठी सगळ्य़ा रुग्णालयाच फिरत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट इतकी तीव्र होती की, त्याना कुठेही बेड उपलब्ध होत नव्हता. तेव्हा त्यांनी शेवटची संधी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. रात्री दीपक यांचा फोन आला तेव्हा चव्हाण हे कर्तव्यावर हजर होते. त्यांनी दोन पोलीस अधिका:यांना ही बाब सूचित केले. तेव्हा दीपक यांच्या भावाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात व्हेटींलेटर बेड उपलब्ध करुन दिला. कैलासवर उपचार सुरु झाले. तेव्हा कुठे दीपकचा जीव भांडय़ात पडला. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.मात्र भाऊ बरा होईल की नाही याची चिंता त्यांना खात होती. कारण भावाच्या मागे त्याची पत्नी, दोन मुले असा परिवार. त्यांचे काय होईल. मात्र रुग्णालयात कैलास यांच्यावर महिनाभर उपचार झाल्यावर योगायोगाने कैलास यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ७ मे रोजी कैलास बरे होऊन घरी परतले. तेव्हा कैलास यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर आत्ता कैलास पूर्ण बरे झाले आहे. कैलासला खाकीमुळे जीवदान मिळाले. यामुळे दोन्ही भावांनी सहाय्यक आयुक्त पोवार यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरिक्षक चव्हाण यांचा पोलिस ठाण्यात जाऊन सकार केला. केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोवार आणि चव्हाण यांच्या सह दोन्ही भाऊ भाऊक झाले होते. पोलिसांमुळेच आज माझा भाऊ या जगात आहे अशी प्रतिक्रिया दीपक यांनी व्यक्त केली आहे.
Coronavirus: खाकीतल्या माणूसकीमुळे त्याला मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 3:58 PM