कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने उद्या शनिवार व रविवारी दोन दिवस महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांची वाटचाल काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.
शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही शनिवारी, रविवारी पूर्णपणे मज्जाव केला आहे. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल, बारला काउंटरवर पार्सल सेवा देता येणार आहे. डी मार्ट आणि मॉल्सदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवेत भाजीपाला, औषधे, दूध, अन्नधान्य यांची दुकाने सुरू राहतील. याखेरीज, अन्य दुकाने बंद राहणार आहेत. पुढील दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद राहतील. दरआठवड्याच्या अखेरीस शनिवार-रविवारी याच पद्धतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेले काही दिवस शनिवार-रविवारी डोंबिवली, कल्याण शहरातील बाजारपेठांत तुफान गर्दी असते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे ही उपाययोजना केली जाणार आहे. आठवड्यातील केवळ दोन दिवस दुकाने बंद करून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाऊन अपरिहार्य असेल, असे बोलले जाते. होळी साजरी करण्यावर महापालिकेने अगोदरच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणी सोसायटीच्या आवारात होळी अथवा धूळवड साजरी करताना दिसले तर त्यांच्यावर देखरेख ठेवून कारवाई करण्याकरिता चार पथकांची नेमणूक मनपाने केली आहे. ज्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन केले जाईल. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट केले.
डिपार्टमेंटल स्टोअर्स सील केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रांतर्गत शहाड रेल्वे स्थानकाजवळील पटेल आर मार्ट या डिपार्टमेंटल स्टोअर्समधील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शुक्रवारी त्याला सील लावल्याची माहिती ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली. या स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होते, खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही केल्याचे सावंत यांनी सांगितले.