शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी बुधवारी पुन्हा १३३ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
या महिन्यात सहाव्यांदा अपुऱ्या लशीच्या साठ्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. एकीकडे शेजारील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू असताना कल्याणडोंबिवली मध्ये मात्र लसीकरण प्रक्रिया वारंवार बंद ठेवावी लागत आहे.
त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असून वरिष्ठ पातळीवर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न करावे अशी अपेक्षा कल्याण डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे लसपुरवठयाबाबत सत्ताधारी कल्याण डोंबिवलीकडे लक्ष देऊन येथील नागरिकांना दिलासा देतात का? ते पाहावे लागेल.