कल्याण: लॉकडाऊन काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील श्रमिक महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी अशा सर्व श्रमिक महिलांना मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच कोणतीच महिला व तिचे कुटुंब उपासमारीचा बळी पडू नये म्हणून आपल्या कार्यालयाचे दार सदैव उघडे आहे असे गायकवाड यांनी शनिवारी आपल्या मातोश्रीच्या एकविसाव्या स्मृतिदिनी जाहीर केले. या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. कचरा वेचक महिला, घरकाम काम करणाऱ्या महिला तसेच इतर कष्टाची कामे करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरीब महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांचा यथायोग्य सन्मान गुंजाई फाउंडेशन तर्फे करण्यात आला. कोविड महामारीच्या काळात सर्वप्रथम कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे अन्नदान तसेच धान्य वाटप कार्यक्रम राबावून गोरगरिबांना दिलासा देण्यात आला होता. अगदी कोकणातील लोकांना सुद्धा मदत देऊ करण्यात आली होती. सध्याचा काळ हा कठीण आहे अनेक कष्टकरी महिलांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. अशा काळात मानवतावादी दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच कोणावरही उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. माझ्या कार्यालयाचे दार सर्वांसाठी खुले आहे असे देखील त्यांनी जाहीर केले.
केडीएमसी हद्दीतील श्रमिक महिलांना नगरसेवकाने दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 9:25 PM