लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण: केडीएमसी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघटनेने मंगळवारी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली. मनपा मुख्यालयात आयुक्त आणि कर्मचारी संघटना यांच्यात पार पडलेल्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले. आयुक्तांनी मागण्यांबाबत सकारात्मक भुमिका घेतल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष रवि पाटील यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करा, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देणे, सेवानिवृत्त व मयत कर्मचा-यांची थकीत देणी देणे, परिवहन कर्मचा-यांना मनपात विलिन करणे, परिवहन उपक्रमातील अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेल्या वारसांना मनपाच्या सेवेत नेमणुका देणे यासह परिवहन उपक्रमाचे वार्षिक अंदाजपत्रक महापालिकेच्या अंदाजपत्रकात एकत्रिकरण करणे आदि मागण्या आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या. परिवहन उपक्रमातील कर्मचारी हे १९९९ पासून कार्यरत असल्याने त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभदेणे आवश्यक आहे हा मुद्दा उपस्थित केला असता, याबाबत राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केल्याची माहीती आयुक्त दांगडे यांनी संघटनेला दिली. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी अदयाप कोणतीही रक्कम अदा करण्यात आली नाही याकडे संघटनेने लक्ष वेधले असता यासंदर्भात तांत्रिक अडचणी आहेत, त्या येत्या तीन महिन्यात दूर केल्या जातील असे दांडगे यांनी स्पष्ट केले. तत्पुर्वी दरमहा १ कोटी रूपये कर्मचा-यांच्या थकबाकीपोटी मासिक पगारासोबत परिवहन उपक्रमाला दिले जातील असेही दांगडे म्हणाले. उपक्रमातील सेवा निवृत्त आणि मयत झालेल्या कर्मचा-यांचे रजा रोखीकरण, सेवा उपदान व अन्य देय रक्कम तात्काळ देण्यात येईल व यापुढे प्रत्येक वर्षी सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या देय रकमेची त्या त्या वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करून संबंधित रक्कम अदा होईल असेही आयुक्तांनी मान्य केले. अनुकंपा तत्वावर कर्मचा-यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेणेबाबतही आयुक्त दांगडेंनी सकारात्मक भुमिका दर्शविल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी दिली. या बैठकीला पाटील यांच्यासह उपाध्यक्ष प्रतिक पेणकर, सरचिटणीस शरद जाधव, गुलाब पाटील, जनार्दन कांबळे, मोहन कान्हात, पंकज डाकवे, बाळा एरंडे, श्रीपाद लोखंडे यांच्यासह परिवहन व्यवस्थापक दिपक सावंत, उपव्यवस्थापक संदीप भोसले उपस्थित होते.