कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यावर गेल्या आठ वर्षात ११४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी तो खर्च वाया गेलेला नसल्याची माहिती दिली आहे. रस्ते दुरुस्तीवरील खर्च हा मागील वर्षाच्या नियमित खर्चापेक्षा ५० टक्के कमी झाला असल्याचे म्हटले आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. सध्या खडी टाकून खड्डे भरले जात आहेत. एक महिन्याच्या कालावधीत सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर अभियंत्या सपना देवनपल्ली कोळी यांनी सांगितले आहे की, बांधकाम साहित्याच्या सरकारी दरसूचीत दरवर्षी ५ ते ७ टक्के इतकी दरवाढ होत असते. त्यात १२ टक्के जीएसटीचा समावेश आहे. महापालिकेने बहुतांश रस्ते सुस्थितीत ठेवले आहेत. गेल्या आठ वर्षात बांधकाम साहित्याच्या दरसूचीतील एकूण ४० टक्के आहे. महापालिकेचा परिघ हा खाडी आणि नदी किनाऱ्याने वेढलेला आहे. अतिवृष्टी आणि भरतीमुळे शहरातील बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत डांबरी रस्ते खराब होतात.
शहरातील जून्या भागातील रस्ते विकास आराखड्यानुसार कमी रुंदीचे आहेत. रुंदीकरणावर मर्यादा आहेत. त्यावर वाहतूक जास्त आहे. त्यामुळे रस्ते खराब होतात. महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. डांबरी रस्त्याचे दर तीन वर्षाने पुनरदुरुस्ती करण केले गेले पाहिजे. कॉन्क्रीट रस्त्याचा खर्च डांबरी रस्त्यांपेक्षा चारपट जास्त आहे. सरकारने दिलेल्या निधीतून काही रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे करण्यात आलेले आहेत. महापलिका हद्दीत ४४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी ३७५ किलोमीटर लांबीचे रस्ते हे डांबरी रस्ते आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ३६० कोटी रुपयांचा निधी रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी मंजूर केला आहे. ही कामे लवकर सुरू केली जाणार आहेत. ४७.५० किलोमीटरचे रस्ते हे अन्य प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. त्यामध्ये कल्याण शीळ रस्ता, डोंबिवली निवासी भागातील रस्ते, गोविंदवाडी बायपास, कल्याणमधील जुना आग्रा रोड यांचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी बहुतांश रस्ते सुस्थितीत आणि खड्डेमुक्त होते. वालधूनी आणि एफ केबीन रेल्वे उड्डाणपूलावर मास्टीक शीट टाकून डांबरीकरण केले होते. हे काम आजही सुस्थितीत आहे.
२७ गावातील रस्ते नियोजनबद्ध विकसीत केलेले नाहीत. बहुतेक रस्ते खडीकरणाने केलेले आहेत. त्यालगत पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते वारंवार खराब होतात.