कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाला सर्व राजकीय पक्ष टिकेचे लक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल असे घोषित केले आहे.
कार्याध्यक्ष आव्हाड यांनी काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली. ढोल ताशांच्या गजरात त्यांनी नागरीकांना आवाहन केले की, जो कोणी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखवेल त्याला ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. दुसरे पारितोषिक ४१ हजार आणि तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपयांचे दिले जाणार आहे. आव्हाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ठाणे जिल्हयातील आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे दोन वेळा खासदार आहे. त्यांच्या लोकसभा मतदार संघात कल्याण पूर्व भाग येतो.
तसेच कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधान मतदार संघातून तीन वेळी निवडून आले आहेत. तरी देखील कल्याण पूर्वेचा विकास झाला नाही. कल्याण पूर्वेला सावत्र वागणूक दिली जात आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. कल्याण पूर्वेचा विकास करावा असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, कल्याण पूर्वेतील एका विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गायकवाड यांना रस्त्यावरील खड्डयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितेल की, खड्डे बुजविण्यचे आश्वासन सर्वच लोक देत आहे.
रस्त्यात खडडे, की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. जे लोक टेंडर घेतात. ती पद्धत बंद झाली पाहिजे. कचरा, रस्त्यावरील खड्डे याचा नागरीकांना नेहमीच त्रास होतो. अनेक रस्ते नवे तयार करुन देखील त्याठिकाणी खड्डे पडले आहे. खड्यांमुळे नागरीकांना मानेचा आणि कंबरेचा त्रास होऊन नागरीकांना आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे असे सांगत रस्त्यांच्या खड्ड्यांचे खापर टेंडर प्रक्रियेवर फोडले होते.