डोंबिवली : ४ जून ला मंगळवारी येथील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त सभागृहात कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभुमीवर या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत बदल केले आहेत, मात्र हे बदल पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. अशी माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली.
मतमोजणी दरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठया संख्येने क्रिडासंकुलाच्या बाहेर गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेता इथले वाहतूक मार्ग बंद करताना वाहनचालकांना पर्यायी मार्ग सुचविले गेले आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक, चार रस्ता, टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम हॉस्पिटल येथे 'प्रवेश बंद' राहील. या मार्गावरून जाणारी वाहने शिवम हॉस्पिटल येथून उजवीकडे वळून जिमखाना रोड, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच सुयोग रिजन्सी अनंतम, पेंढारकर कॉलेज मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल, येथे 'प्रवेश बंद' असणार आहे. ही वाहने आर. आर. हॉस्पिटल येथून डावीकडे वळून कावेरी चौक, एम.आय.डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील. तर खंबाळपाडा रोड, ९० फुट रस्ता, ठाकुर्ली रोडकडून घरडा सर्कलकडे तसेच विको नाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. खंबाळपाडा रोड, ९० फुट रस्ता, ठाकुर्ली रोड कडून येणारी वाहने खंबाळपाडा रोड टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. आजदे गाव आणि आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कल मार्गे बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना घरडा सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार असून आजदेगाव आणि आजदे पाडा कमान येथून बाहेर पडणारी वाहने डावीकडे वळून शिवम हॉस्पिटलमार्गे इच्छित स्थळी जातील, विको नाका कडून बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हॉटेल मनिष गार्डन येथे 'प्रवेश बंद' असून विको नाकाकडून येणारी वाहने हॉटेल मनिष गार्डन येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
वाहतूकीत बदल केले गेले असताना याठिकाणी कोळसेवाडी आणि डोंबिवली वाहतूक पोलिसांची मोठी कुमक मतमोजणी केंद्राबाहेर राहणार आहे. वाहतूक बदल्याच्या अंमलबजावणीसाठी ७० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचा बंदोबस्त ठिकठिकाणी असणार आहे. आवश्यकतेनुसार बाहेरून देखील वाहतूक पोलिस मागविले जाणार आहेत.