उल्हासनगर : महापालिका रुग्णालय प्रशासनाने गेल्या काही महिन्याचे पगार दिले नाही व खाजगी फायनन्स कंपनीचा लागलेल्या पैश्याच्या तगादयातून सुरक्षारक्षक राजू धाटावकर यांनी राहत्या घरात सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने एकाचा बळी गेल्याचा आरोप विविध सामाजिक संस्थेने करून आर्थिक मदतीची मागणी करीत महापालिकेसमोर निदर्शने केली.
उल्हासनगर महापालिकेने कोविड काळात २०० खाटाचे रुग्णालय रिजेन्सी अंटेलिया येथे उभारून त्यासाठी तब्बल ११ कोटीचे साहित्य खरेदी केले. तसेच शासनाच्या निधीतून ऑक्सिजन प्लँट उभारला. तब्बल दोन वर्षे उदघाटनाच्या प्रतिक्षेनंतर कॅशलेसच्या नावाखाली महापालिकेने रुग्णालयाचे खाजगीकरण केले. पिवळे व केशरी शिधावाटप पत्रिका असणाऱ्या रुग्णांवर शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातात. रुग्णालय सुरू झाले तेंव्हा पासून राजू धाटावकर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. धाटावकर यांच्यासह रुग्णालयात काम करणाऱ्या ३५ कर्मचाऱ्याना गेल्या काही महिन्या पासुन पगार मिळाला नाही. घर चालविण्यासाठी राजू यांनी खाजगी फायनन्स कंपन्याकडून कर्ज घेतले होते. दरम्यान एकीकडे पगार नाही. तर दुसरीकडे खाजगी फायनन्स कंपन्यांचा पैशासाठी लागलेला तगादा. या त्रासून कंटाळून त्यांनी सोमवारी दुपारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
महापालिका रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे राजू धाटावकर या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्यासह अन्य सामाजिक संस्थेने केला. तसेच मंगळवारी दुपारी मनसेसह सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी महापालिका मुख्यालय समोर एकत्र येत निदर्शने करून चौकशीची मागणी केली. तर महापालिका रुग्णालय प्रशासनाने पगार नियमित दिला जात असल्याचे सांगितले.
पगार नाही व कर्जाचा तगादा
मृत राजू धाटावकर याना गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालय प्रशासनाने पगार दिला नाही. म्हणून घर संसारसाठी खाजगी फायनन्स कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. पगार नाही व कर्जासाठी कंपनी कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्याच्या त्रासातून आत्महत्या केल्याचा आरोप राजू धाटावकर यांच्या पत्नीने केली आहे.
घरात वृद्ध आई-वडील
कुटुंबात एकमेव कमावता असलेल्या मृत राजू धाटावकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व वृद्ध आई-वडील आहेत.
२ लाखाची मदत?
महापालिका रुग्णालय प्रशासनाने मृत राजू धाटावकर याच्या पत्नीला ३ लाखाचा धनादेश व बाकी पगार जमा केला, अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.