"तो अधिकारी मोठ्या बापाचा असला तरी..."; मराठी कुटुंबियांना झालेल्या मारहाणीवर अजित पवार संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:27 IST2024-12-20T12:11:59+5:302024-12-20T12:27:07+5:30
कल्याणमध्ये मराठी कुटुंबियांना झालेल्या हाणामारीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

"तो अधिकारी मोठ्या बापाचा असला तरी..."; मराठी कुटुंबियांना झालेल्या मारहाणीवर अजित पवार संतप्त
Ajit Pawar on Marathi Family Attack: कल्याणच्या एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्ला नावाच्या व्यक्तीने मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करत गोंधळ घातला. बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये मारहाणीमध्ये अनेक जण जखमी असून एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद नागपूरच्या अधिवेशनात उमटले आहेत. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हे प्रकरण मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.
कल्याणमध्ये उच्चभ्रू सोसायटीत मंत्रालयात काम करणार्या परप्रांतीयाने मराठी भाषिक कुटुंबियांना जबर मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणार्या व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हे प्रकरण मांडलं. महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर ही परिस्थिती येत असेल तर मराठी माणूस शांत बसणार नाही असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असं म्हटलं.
"हा महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या घटनेबाबत जी माहिती दिली आहे ती तपासून घेण्यात यावी. तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीने प्रशासन वागेल. याची खात्री मी देतो. या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले जातील," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कल्याण येथील योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळ, मारहाणीपर्यंत गेले. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग धरून शुक्ला यांनी गुंडांना बोलवून अभिजित देशमुख यांना मारहाण केली. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.