कल्याण : उल्हासनगर येथे दाेन दिवसांपूर्वी रस्त्यासाठी खाेदलेल्या खड्ड्यांतील पाण्यात बुडून दाेन बालकांचा मृत्यू झाला हाेता. ही घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये इमारतीसाठी खाेदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून १२ वर्षांच्या मुलाला शनिवारी जीव गमावावा लागला. रेहान शेख असे मृत बालकाचे नाव आहे.
शाळेत न जाता रेहान खेळण्यासाठी गेला. खेळता-खेळता रेहानचा बाॅल इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात गेला. तो काढताना ताेल जाऊन पाण्यात पडला . काही नागरिकांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाने तासाभराने रेहानचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला आहे.
बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी
खड्डा खाेदणाऱ्या बिल्डरने तेथे सुरक्षेच्या काेणत्याही उपाययाेजना केलेल्या नाहीत. तेथे संरक्षक भिंतही बांधलेली नाही. भविष्यातही अशा दुर्घटना घडू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच रेहान याचा मृत्यू झाला असून त्यास संबंधित बिल्डर जबाबदार आहे. त्याच्याविराेधात कारवाई केली जावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.