कल्याण - मनसेच्या कल्यण शहर महिलाध्यक्षा शीतल विखणकर यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विखणकर या त्या राहत असलेल्या कल्पेश अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी जळाल्या होत्या अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्या भिवंडी कोनगाव येथील घरात जळाल्या होत्या. ज्या घरात त्यांचा गाडी चालक अविनाश पाटील राहतो ही माहिती समोर आली आहे. हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
घरातील गॅसच्या गळती मुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. ही घटना गेल्या शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असल्याची माहिती उघड झाली. घटनेनंतर विखनकर यांना उपचारासाठी आधी भिवंडी येथील वेद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या गंभीर भाजल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलवण्यात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव आज त्या राहत असलेल्या इमारतील घरी आणले गेले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कल्याणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मनसेचे नेते मंडळी उपस्थित होती.
विखणकर यांच्या जळीत प्रकरणाची माहिती ज्या वेळी पोलिसाना देण्यात आली होती. त्यावेळी ही घटना विखणकर राहत असलेल्या कल्पेश इमारतीत घडल्याची खडकपाडा पोलिसांना देण्यात आली होती. ही घटना कल्पेश इमारती ऐवजी भिवंडीतील कोन गाव परिसरातील एका इमारतीत घडल्याचे सांगण्यात आले. ही घटना घडली त्या घरात विखणकर यांचा गाडी चालक राहतो. त्यानेच विखणकर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या घटनेचा तपास आत्ता भिवंडी कोनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याचे खडकपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.