कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या विकास कामांचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरु असतानाच शिवसेनेचे नेते सुधीर जोशी यांच्या निधनाची बातमी येताच कार्यक्रम आटोपून भाषणबाजीला फाटा देत मंत्र्यांनी मुंबई गाठली.दुर्गाडी खाडी पूलाच्या चार लेनचा शुभारंभ फित कापून पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री कपील पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पूलाच्या लेनच्या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री एकत्रित येणार असल्याने त्याठिकाणी विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्याठिकाणी काही एक घोषणाबाजी झाली नाही. ठाकरे यांच्यासह नव्या पूलावर मंत्र्यांचा ताफा खाडी किनारी नजीक आला. त्याठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत खाडी किनारा विकास आणि नौदल संग्रहालयच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आयुक्तांनी विकास कामाच्या प्रकल्पाची फित दाखविली जाईल असे घोषित केले.
इतक्यात सुधीर जोशी यांचे निधन झाल्याच बातमी येतातच सगळ्य़ांनी हा कार्यक्रम गुंडाळून भाषणबाजी न करताच ठाकरे यांच्यासह सगळे महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सभागृहात पोहचले. या सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले असल्याने त्याठिकाणी ठाकरे यांच्या हस्ते सभागृह खुले करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी अत्यंत अटोपशीर भाष्य करीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधीर जोशी यांच्या निधन झाल्याचे सांगून त्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. जोशी यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मेहनत सारी फूकट गेली..
ठाकरे येणार असल्याने महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी केली होती. छानपैकी गालिचा अंथरला होता. अगदी नवा लूक दिला होता. तसेच खाडी किनारीही रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम आटोपता घ्यावा लागल्याने करण्यात आलेला सगळा खचरू फूकट गेला. एमएमआरडीए आणि महापालिकेचा कार्यक्रम असल्याने शिवसेनेच्या पदाधिका:यांना फारसी कल्पना दिली गेली नव्हती. त्यामुळे मोजकेच पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थीत होते.