मुरलीधर भवार, कल्याण- पत्नी आणि मुलाची हत्या करणारा आरोपी दीपक गायकवाड हा न्यायालयीन कोठडीत आहे. गुंतविलेल्या पैशावर जास्तीचे व्याज देऊन परतावा देतो असे आमिष दाखवून जवळपास ७०० जणांच्या ३९ कोटी रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आत्ता ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणारा दीपक याने त्यांची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली. पती पत्नीत वाद होत असल्याने त्याने ही हत्या केल्याचे सांगितले होते. दीपक याची निधी रिसर्च फर्म नावाची कंपनी होती. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ््यांना नागरीकांना दीपक हा जास्त परतवा देण्याचे आमिष दाखवित होता. दीपक याच्या आमिषाला बळी पडून अनेक लोकांनी त्याच्या निधी रिसर्च फर्ममध्ये पैसे गुंतविले होते. दोन दिवसापूर्वी कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांना शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्यासह मयत महिलेचे नातेवाईक आणि फसवणूक झालेल्या नागरीकांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान साडे तीन हजार लोकांचे जवळपास ४०० कोटी रुपये बुडविले आहे अशी माहिती नागरीकांनी दिली होती.
या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांनी सांगितले की, दीपक याच्या आमिषाला बळू पडून गुंतवणूक करणारे जवळपास ७०० जण समोर आले आहेत. दीपक याने या नागरीकांकडून ३९ कोटी रुपये उकळून त्यांचा अपहार केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.