मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सात कोविड रुग्णालयांसह महापालिका हद्दीतील ८७ खासगी कोविड रुग्णालये रुग्णांवर उपचार करीत आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यावर रेमडेसिविर आणि टोसिलीझूमॅब ही दोन महत्त्वाची इंजेक्शन डॉक्टरांकडून सांगितली जातात. रेमडेसिविर इंजेक्शन खासगी रुग्णालयांनी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र काही अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाइकास ते बाहेरून आणण्यास सांगितले जाते.इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी नियंत्रण समितीच्या माध्यमातून वितरण नियंत्रित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे खासगी रुग्णालयांनी नोंद करावी. किती इंजेक्शन हवीत, त्याचा अहवाल महापालिका सात वाजेपर्यंत तयार करते. तो रात्री दहा वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण समितीकडे जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णालयास इंजेक्शन उपलब्ध होते. रेमडेसिविर जिल्हा नियंत्रण समितीकडून मिळते. त्याचबरोबर महापालिकेच्या रुग्णालयातही मिळते. मात्र टोसिलीझूमॅब हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे इंजेक्शन कुठून व कधी मिळणार, या विवंचनेत रुग्णाचे नातेवाईक आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोविड रुग्णालयात रेमडेसिविर आणि फेव्हीपिरॅविर पुरविले जाते. मात्र खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हा नियंत्रण समितीकडून उपलब्ध करून दिले जाते. टोसिलीझूमॅब उपलब्ध नाही. - डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसीइंजेक्शन बाहेरून आणायला सांगू नयेत हा नियम असला तरी काही रुग्णांची प्रकृती नाजूक झाल्यावर तातडीने इंजेक्शन आणायला सांगितले जाते. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हा नियंत्रण समितीकडे महापालिकेच्या माध्यमातून मागणी केली जाते. मात्र इंजेक्शन दुसऱ्या दिवशी उपलब्ध होते. अशा परिस्थितीत खासगी कोविड रुग्णालय काय करू शकते? - संचालक ,खासगी कोविड रुग्णालय
मी रिक्षाचालक आहे. माझा भाऊ इन्शाद वहिद खान याला कोरोना झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याच्या उपचारासाठी सहा इंजेक्शन लिहून दिली. ती मला मिळत नाहीत. डॉक्टरांकडून योग्य माहिती दिली जात नाही. - इमरान वहिद खान, पत्रीपूल, कल्याण पूर्व
माझा भाऊ जगन्नाथ मिरजकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यासाठी डॉक्टरांनी टोसिलीझूमॅब हे इंजेक्शन आणायला सांगितले होते. भरपूर प्रयत्न केले; पण इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्याला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. - नितीन मिरजकर, रामबाग, कल्याण पश्चिममाझे वडील, आई आणि भाऊ हे कोरोनाबाधित झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आई आणि वडिलांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले. मात्र भाऊ प्रशांतला इंजेक्शन मिळत नसल्याने त्यासाठी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी इंजेक्शन उपलब्ध झाले. तोपर्यंत बरीच वणवण करावी लागली. -स्नेहल मोरे, विजयनगर, कल्याण पूर्व
माझ्या मित्राचे नातेवाईक प्रताप चव्हाण हे नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना रेडमेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्याच्यासोबत जवळचे नातेवाईक नव्हते. त्यांचा मुलगा भारतीय सैन्यदलात आहे. त्यांच्याकडून कळविले गेले. इंजेक्शन मिळत नाही. किंमतही जास्त सांगितली जात आहे. दोन इंजेक्शऩ उपलब्ध करून कल्याणहून नगरला तीन तासांत पोहोचविली. - सुरेश काटे, आजदे, डोंबिवली