कल्याण-मनसेचे आमदार राजू पाटील यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी फोटो व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. फाेटो व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी तक्रार दिली आहे. कारवाई न झाल्यास त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवू अशा इशारा मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आला.
मनसे आणि शिवसेनेत राजकीय शीत युद्ध सुरु आहे. दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात टीका करणारे ट्वीट सोशल मिडियावर करीत असतात. मनसे आमदारांकडून वारंवार सत्ताधारी पक्षासह शिवसेना, मुख्यमंत्री आणि खासदार यांच्या विरोधात ट्वीट केले जाते. मनसे आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यात त्यांच्या समर्थकांनी भावी खासदार असा उल्लेख असलेला केक कापला होता.
डोंबिवलीतील एका कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले. राजू पाटील यांच्या नामोल्लेख न करता त्यांच्यावर चांगलीच टिका केली. मनसे आमदार पाटील यांना खासदारकीचे स्वप्न पडत आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने अशी टिका केली होती. त्यांच्या टिकेनंतर आमदार पाटील यांनी आपका क्या होंगा जनाबे अली या हिंदी चित्रपटातील गाजलेल्या गाण्याच्या आधारावर आपका क्या होंगा माजदार असा रिल्स तयार केला होता. मनसेकडून हा रिल्स व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मिडियावर मनसे आमदारांचा एक फोटो व्हायरल करण्यात आला. त्यांच्या फोटोशी छेडछाड करुन आक्षेपार्ह फोटो व्हायरल केला गेला.
आमदारांची बदनामी करणाऱच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे मनसेची तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणी मनसे आमदार पाटील हे त्यांचा फोटो व्हायरल करुन बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर नोटिस पाठवून अब्रनुकसानाचा दावा दाखल करणार आहेत.