कल्याण : कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी सेना - भाजपमधील राजकीय फटाक्यांमुळे वातावरण दूषित झाले असताना बुधवारची सकाळ मात्र नागरिकांसाठी प्रसन्न आणि आल्हाददायक ठरली आहे.
आज कल्याण आणि आसपासच्या ग्रामीण भागात सकाळी दाट धुके पसरले होते. धुके इतके दाट होते की एका इमारतीमधून दुसरी इमारत देखील नजरेस पडत नव्हती. रोजच्या पेक्षा आजची सकाळ कल्याणकरांसाठी स्पेशल ठरल्याने टोलेजंग इमारतींच्या गॅलरी मधूनच नागरिकांनी गरमागरम चहाचा आस्वाद घेत निसर्गाचा आनंद घेतला.
शहर आणि ग्रामीण भाग धुक्यात हरवून गेल्याने सकाळी फेरफटका मारायला निघालेल्या नागरीकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला. शहर राजकीय वातावरणामुळे ढवळून निघाले असताना आज धुक्याचे आगमन झाल्यामुळे आजची सकाळ कल्याणकरांसाठी आरोग्यदायी ठरली आहे.