सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका उद्यानाच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही उद्यानाची दुरावस्था झाली. नेताजी गार्डनची दुरावस्था सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, महापालिका बांधकाम विभागाच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर महापालिका अंतर्गत ६३ पेक्षा जास्त उद्याने शहरात असून त्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण व पुनर्बांधणी साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये महापालिका खर्च करीत आहे. महापालिकेने कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यान, सरोजिनी नायडू उद्यान, विजय भारत उद्यान व पुष्प पावन उद्यान यांच्या सुशोभीकरणासाठी तब्बल अड्डीच कोटीच्या निधीला गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. तसेच शहराच्या इतर उद्यानाच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी महापालिकेने मंजूर केला. मात्र मंजूर झालेले काम झालें का? याबाबत स्थानिक नागरिकांसह विविध पक्षाच्या नेत्यांची प्रश्न उपस्थित केला. कॅम्प नं-५ येथील नेताजी उद्यानाची दुरावस्था झाली असून भंगारचोरांनी उद्याच्या संरक्षण भिंती मधील लोखंडी जाळी चोरणे सुरू केली. संरक्षण भिंतीवरील लोखंडी जाळी चोरीला गेल्याने, रात्रीच्या वेळी गर्दुल्ले, नशेखोर, भुरटे चोर आदींच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
शहरातील सर्वच उद्यानाची दुरावस्था नेताजी व लालसाई उद्याना सारखी झाल्याने, महापालिका करीत असलेला कोट्यवधींचा खर्च गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. शहरातील रस्ते, साफसफाई, प्लास्टिक कचऱ्याने तुंबलेले नाले, पाणी टंचाई आदी समस्या महापालिका आयुक्ता समोर उभे ठाकले असून आयुक्त कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या पाच वर्षात उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होऊनही उद्यानाची दुरावस्था का?. सुरक्षा रक्षक काय करतात? अभियंता व बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही का? आजी-माजी नगरसेवकांनी बघायची भूमिका घेतली का? ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का नाही? असे अनेक प्रश्न उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख यांच्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे