कल्याण: सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे. काही लोक एकत्र आल्याशिवाय सत्ता काबीज करता येत नाही. त्यामुळे मी अनेकवेळा ऐक्याची भुमिका मांडलेली आहे. परंतू रिपाई एकत्र होत नाही. अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणमधील कार्यक्रमात व्यक्त केली.
दलित पँथर चळवळीला मंगळवारी ५० वर्षे पुर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ विठ्ठल शिंदे लिखित ‘दलित पँथर क्रांतिकारी नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आठवले बोलत होते. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक शिंदे आणि साहीत्यिक प्रा. डॉ प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
आठवले पुढे म्हणाले दलित पँथर चवताळून उभा राहीला, तो अन्याय करणा-यांविरोधात. आमच्या पोटात आग पेटली होती न्यायासाठी स्वत: उध्वस्त होणे अशी भुमिका आम्ही घेतली होती. विनाकरण कोणाला उध्वस्त करणारे नव्हतो. पँथरच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा केली नाही. दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर रिपाईचे ऐक्य कायम राहीले असते.
राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात मतभेद झाले नसते तसेच मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद उभा राहीला नसता तर आज चित्र वेगळे असते. परंतू मार्क्सवादापेक्षा आंबेडकरवाद व्यापक आहे असे माझे मत आहे. मार्क्सवादाच्या पलीकडे जाणारा असा आंबेडकर वाद आहे. सर्वाना एकत्र घेतले पाहिजे अशी भुमिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घेतली होती याकडे आठवलेंनी यावेळी लक्ष वेधले.