डोंबिवली : भाजप कार्यकर्ता मनोज कटके या कार्यकर्त्यावर झालेला हल्ला जीवघेणा असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे, हे योग्य नाही. त्यामुळे अधिवेशन संपताच डोंबिवलीच्या पोलीस ठाण्यांवर महामोर्चा काढण्यात येईल, त्याला मी स्वतः नेतृत्व करेल, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कटकेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते शुक्रवारी येथील एम्स हॉस्पिटलमध्ये आले असता त्यानी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
मनोजवरील हा हल्ला साधा नसून तो जीवघेणा हल्ला होता, त्याच्यावर झालेल्या जखमा पाहून हल्ला किती गंभीर होता, हे कळते. मनोज वाचला असला तरी त्याचा जीव घेण्याच्या दृष्टीने तो केला असल्याचे स्पष्ट आहे. यापुढे अशा घटना होता कामा नये याची पोलिसांनी नोंद घ्यावी म्हणून मी येथे आलो आहे. या हल्ल्यामागे सुत्रधार जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचावे, गंभीर गुन्हे दाखल करावेत, त्याचा शोध घ्यावा, असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिस यंत्रणेने पारदर्शी पद्धतीने काम करावे ही अपेक्षा आहे. पण, ते करत नसल्याने मला इथे यावे लागले. पोलिस यंत्रणा काम करत नसेल तर मला मोर्चा काढावा लागेल, याचा आवाज सभागृहात उचलण्यात येईल असेही ते म्हणाले.
आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागे सक्षम उभे आहोत याची नोंद सर्वांनी घ्यावी. डॉक्टर मिलींद शिरोडकर यांच्याशी देखील कटके संदर्भात फडणवीस यांनी चर्चा करुन योग्य उपचार करावेत असे सांगितले. दरम्यान, यावेळी आमदार रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड, शशिकांत कांबळे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांसह भाजपच्या माजी नगरसेवकांनी पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत शिवसेनेवर थेट आरोप करत हे प्रभाग रचना आधीच ठरलेली आहे याची माहिती फडणवीस यांना दिली. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकांना त्रास देण्याचा प्रकार शिवसेनेने सुरू केला आहे याबद्दल थोडक्यात माहिती त्यांना देण्यात आली.