कल्याण: मराठा समाजाचे आतापर्यंत इतके मुख्यमंत्री झाले. परंतू त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी कल्याणमध्ये व्यक्त केली.पाटील हे कल्याण पश्चिमेतील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला आले होते. मेळाव्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी जालन्यातील घटनेबाबत भाष्य करताना त्यांनी या भावना मांडल्या.
देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळावे ही भावना सर्वपक्षीयांची होती. फडणवीस यांनी आरक्षण दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने ते कोर्टाने रद्द केले, मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, हे निश्चितपणे यात काही तरी मार्ग काढतील.
जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, त्याचे राजकारण कोणीही करू नये. जे लोकं कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कधीही बोलले नाहीत, असे लोकही तिकडे जायला लागले आहेत. मराठा समाजाबाबत भारतीय जनता पक्षाच्या अतिशय सकारात्मक भावना आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उलट एवढे मराठा मुख्यमंत्री झाले असतील त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल होते. म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपने केलेले भरीव काम जनतेच्या समोर आहे. भारतीय जनता पक्ष त्याला कधीही विरोध करणार नाही असे पाटील म्हणाले.