डोंबिवली : ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गावर शहरातील मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबाल पाडा परिसरातील भक्त जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून बाप्पाला निरोप देत आहेत. ते वर्षानुवर्षे तेथे जात असल्याने त्यांना रेल्वे पोलीस सुरक्षा देऊन लोकल नसताना वाट काढून देण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी त्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कल्याण ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही. या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते.
विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक गणेशमंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले असून अनंत चतुर्दशीला देखील सुरक्षा व्यवस्था ठेवून विसर्जन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून खाडी किनारी जावे लागू नये म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कचोरे आणि खंबाल पाडा परिसरात कृत्रिम तलावाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पण तरीही काही भाविक दरवर्षीप्रमाणे रुळापलीकडे जाऊन विसर्जन करत आहेत.
तेथील स्थानिकांचा तो अनेक वर्षांचा प्रश्न आहे, रूळओलांडून ते पलीकडे जातात, त्यांना सुरक्षा देण्यासाठी आरपीएफ, स्थानिक टिळक नगरचे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस आदी बंदोबस्त ठेवणार आहेत. तसेच त्या ठिकाणाहून रेल्वे जाताना काहीसा वेग कमी ठेवावा, हॉर्न वाजवावा याबाबत वरिष्ठ पातळीवर सूचित करण्यात आले आहे.मुकेश ढगे,प्रभारी पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे