कल्याण-भोपर गावात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरीकांनी आज मानपाडा रोडवरील शनि चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.
भोपर गावातील कमानी विटभट्टी, माऊली मुक्ताईनगर, स्मशानभूमी परिसर, भिमाईनगर, विरोबानगरात पाणी येत नाही. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून पाणी टंचाई आहे. या ठिकाणच्या जलवाहिनीवर अनेकांनी बेकायदा नळ जोडण्या घेतल्या असल्याने नागरीकांना पाणी मिळत नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात संदप भोपर परिसरातील गायकवाड पाडयातील गायकवाड कुटुंबियातील पाच जण कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेले होते. त्याठिकाणी पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
यंदाही भोपर गावात पाणी टंचाई उद्भवली आहे. त्यावर महापालिका प्रशसानाकडून तोडगा काढला जात नसल्याच्या निषेधार्थ सदानंद थरवळ, एकनाथ पाटील, रमेश पाटील, काळू कोमास्कर, गंगाराम शेलार, रंगनाथ ठाकूर, दीपक ठाकूर यांनी शनि चौकात धरणे आंदोलन केले. समस्या सुटली नाही तर बेमुदत उपोषणासह मोर्चा काढण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंते किरण वाघमारे आणि शैलेश कुलकर्णी यांनी भेट दिली. येत्या शुक्रवार बेकायदा नळ जोडण्या आणि बूस्टर पंपाच्या विरोधात धडक कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.