उल्हासनगर : गेल्या ७ वर्षांपासून महापालिका शाळा क्रं-२४ व १८ च्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नसल्याने, शाळेतील हजारो विद्यार्थी एका खाजगी संस्थेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. तर शाळा बांधणीची निविदा निघाली असून लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी येथे महापालिकेची शाळा क्रं-२४ व १८ अशी मराठी व हिंदी माध्यमाच्या दोन शाळा आहेत. त्यामध्ये हजारो मुले शिक्षण घेत होते. मात्र गेल्या ७ वर्षांपूर्वी शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळा एका खाजगी संस्थेच्या इमारती मध्ये हलवून शाळा इमारत जमीनदोस्त केली. महापालिका शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या ७ वर्षांपासून शाळा इमारत बांधण्याचा मुहूर्त लागला नाही. दुसरीकडे खाजगी संस्थेत हलविलेली शाळा लांब अंतरावर असल्याने, अनेक मुलांनी खाजगी शाळेत प्रवेश घेतल्याने, अथवा काही मुलांनी शिक्षण सोडल्याने, शाळेची पटसंख्या निम्या पेक्षा कमी झाल्याचा आरोप समाजसेवक प्रवीण माळवे यांनी केला.
महापालिका शाळा क्रं-२४ व १८ या मराठी व हिंदी माध्यमाच्या शाळा इमारत बांधण्यासाठी मनसेसह स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले. मात्र प्रत्येक वेळी महापालिकेकडून आश्वासन दिले, अशी माहिती समाजसेवक प्रवीण माळवे यांनी दिली. अखेर महापालिका आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी शिक्षण मंडळावर लक्ष केंद्रित करून, शाळा बांधणीला ८ कोटीच्या निधीची तरतूद करून निविदा काढली आहे. लवकरच शाळा बांधणीचे भूमिपूजन करणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. तब्बल ७ वर्षानंतर शाळा इमारत बांधणीला मुहूर्त लागणार असल्याने, परिसरात आनंद व्यक्त होत आहे. पुनर्बांधणी अभावी महापालिका शाळा एखाद्या खाजगी संस्थेत तब्बल ७ वर्ष चालविण्याचे हे दुर्मिळ उदाहरण असून याप्रकारने महापालिका शिक्षण विभागाचे धिंडवडे मात्र निघाले आहे.
शिक्षण मंडळ महापालिका मुख्यालयात महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय एका वूडलँड इमारती मध्ये सुरू असल्याने, विभागात सावळागोंधळ उडाला होता. आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक जमीर लेंगरेकर यांच्या प्रयत्नातून मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात आणण्यात आले. महापालिका शाळा क्रं-२४ व १८ ची पुनर्बांधणी एका वर्षात होणार असून दिवाळीपूर्वी शाळा बांधणीचे भूमिपूजन होणार आहे. कामाची निविदा निघाली आहे.- आयुक्त अजीज शेख