डोंबिवली: दिवा डोंबिवली या सुमारे ९ किमी अंतरावररील रेल्वे स्थानकादरम्यान म्हातार्डेश्वर मंदिराजवळ नवीन स्थानक व्हावं अशी मागणी अनेक वर्ष प्रलंबित असताना मध्य रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी त्या मागणीकडे कानाडोळा करत डोंबिवली नजीक कोपर स्थानकाला मंजुरी दिली होती. त्यात आता पुन्हा कोपर दिवा मार्गावर एक स्थानक व्हावे अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांकडे केली होती, त्यानूसार बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिवा कोपर दरम्यान नवीन स्थानकाच्या नियोजित जागेची पाहणी केली.
त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये नवीन स्थानक होण्याचा आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्याचे दिसून येते. शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा व नव्या स्थानक संदर्भात चर्चा केली होती, त्या पाहणीत माजी उपमहापौर रमाकांत मढवी, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत, भूषण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते, मढवी यांनी सर्वप्रथम खासदार शिंदे यांचे आभार व्यक्त करताना म्हटले की,भविष्यात म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचा स्टेशन होणार असल्याने मध्य रेल्वे मार्गावर दिवा आणि कोपर दरम्यान रेल्वे स्टेशन होणे ही काळाची गरज बनली आहे.
शिवाय दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवास्थानकाचा भार सुद्धा या नवीन रेल्वे स्थानकामुळे कमी होणार आहे. अलीकडे दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे, अनेक नवीन सुख सुविधा या स्थानकाला मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे दिवा स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे यांच्या माध्यमातून प्रलंबित मागणी पूर्ण होईल असा आशावाद दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी यावेळी व्यक्त केला.