कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नव्याने जाहीर केलेल्या नियुक्त्यांवरून उद्भवलेल्या वादाचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी त्याची दखल घेतली आहे. ते दोन दिवसांत नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होते का ती कायम राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी मानाची पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. यात ३२० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष व गट अध्यक्ष आहेत.
मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी मनसेत प्रवेश केला. कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्षपदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य एकाच्या झालेल्या नियुक्तीवरून ही नाराजी उफाळून आली आहे. उपशहराध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे सादर केलेले राजीनामे सोमवारी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्याकडे दिले जाणार होते; परंतु पाटील यांनी चर्चेसाठी बोलावल्याने राजीनामा सादर करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आमदारांच्या भेटीनंतरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे संबंधित नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.