-अनिकेत घमंडी डोंबिवली - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी वाढत राहावी याकरिता देशभर ‘हर घर तिरंगा‘ अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वतीने १० हजार ५०० तिरंगा झेंड्याचे घरपोच वाटप करण्यात आले आहे.
प्रत्येक भारतीयाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरी व आस्थापनांवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्य संग्रामात आहुती दिलेल्या लाखो महानायकांना अभिवादन करावे असे आवाहन यावेळी पवार यांनी केले आहे. ‘हर घर तिरंगा‘ अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिक यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. कल्याण पश्चिममध्ये पवार यांच्या वतीने तिरंगा झेंडा वाटप करण्यासोबतच शुक्रवारी ७५ मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू करून देणे, शनिवारी ‘भव्य तिरंगा दिंडी‘, रविवारी बाईक रॅली असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सुध्दा यावेळी पवार यांनी दिली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी सुधीर जोशी, समृद्धी देशपांडे, स्नेहल सोपारकर, श्रीधर देवस्थळी, मयुरेश आगलावे, भावेश जोशी, गोपीनाथ लिपाने, प्रसाद जव्हेरी, राजू तन्ना यांच्यासह अनेक कार्यकर्ते आदींचे योगदान असल्याचे सांगण्यात आले.