कल्याण : अस्थिव्यंग अपंगांकरीता मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन पश्चिमेकडील वाडेघर येथील शशांक बालविहार विद्यालय येथे रविवारी करण्यात आले होते. फयुश लुब्रिकेंटस, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिड टाऊन तसेच नासिओ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, दिव्यांगांना व्हिलचेअर, वॉकर, कृत्रिम हात, पाय, बूट आदी साहित्य वाटप करण्यात आले. सुमारे १५० दिव्यांगांनी याचा लाभ घेतला.
नासिओचे योगेंद्र शेट्टी यांनी सांगितले की, दिव्यांग बांधव हा एक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, हालचाल करता यावी यासाठी आमच्याकडून नेहमीच सहकार्य केले जाते. दिव्यांगांना देण्यात आलेल्या साहित्याचा त्यांनी योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. शहरातील दिव्यागांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु, ग्रामीण भागातील दिव्यांगाना फार मोठी कसरत करावी लागत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाला पराग डोंगरे, सुनील कुमार, गौरव कपाडिया, कांचन पुजारी आणि अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, माधुरी क्षीरसागर, रोहिणी घोलप, निजाम शेख यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते.