डोंबिवली: महावितरणच्या कल्याण पश्चिम आणि पूर्व विभागातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र आणि आवश्यक साधनांच्या किटचे शनिवारी वाटप करण्यात आले. यातून या दोन्ही विभागात कार्यरत ३४३ कंत्राटी वीज कामगार 'स्मार्ट' बनले आहेत.
गतिमान ग्राहक सेवेसाठी नियमित कर्मचाऱ्यांसोबत गरजेच्या ठिकाणी महावितरणने कंत्राटदारांच्या माध्यमातून कंत्राटी वीज कामगार उपलब्ध करून दिले आहेत. नियमित कर्मचाऱ्यांना महावितरणकडून गणवेश व ओळखपत्र पुरवण्यात येते. मात्र विविध कंत्राटदारांकडून पुरवण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा प्रश्न होता.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित कंत्राटदारांच्या समन्वयातून गणवेश निश्चित करण्यात आला. मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, व्यवस्थापक करण हुनूरकर यांच्या टीमने कंत्राटदारांच्या सहकार्यातून कल्याण पश्चिम विभागातील १७१ आणि कल्याण पूर्व विभागातील १७२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र आणि आवश्यक साधनाची किटचे वितरण केले. यातून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन ओळख मिळाली असून त्यांच्याकडून ग्राहक सेवेला अधिक गती व प्रोत्साहन मिळेल असे सांगण्यात आले.