कल्याण - दिवाळी निमित्ताने मनसेने डोंबिवलीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्याच निश्चित केलं आहे. मात्र योग्य त्या परवानग्या घेऊन कार्यक्रम करणार असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिसांकडे परवानगी मिळावी अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली असून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
येत्या २ तारखेपासून दिवाळी हा सण सुरु होत आहे. आपल्या डोंबिवलीचे वेगळेपण म्हणजे फडके रोडवरील दिवाळी पहाट हा कार्यक्रम. परंतु मागील २ वर्ष कोविड १९ या रोगराईमुळे हा सण साजरा होऊ शकला नाही. मात्र, आता काही अंशी यावर नियंत्रण असल्याने आणि सरकारी आकडेवारीप्रमाणे बहुतांशी लोकांचे लसीकरण झाले असल्याने व बरेच निर्बध शिथिल केले असल्याने या वर्षी महारष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आप्पा दातार चौक येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.
गुरुवार ,४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सकाळी १० या कालावधीत दिवाळी पहाट हा कार्यक्रम तर शुक्रवार ,५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत दिवाळी सांज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिवाळी निमित्ताने १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर मनसे कार्यालय परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आणि विद्युत रोषणाईसाठी पालिका आणि पोलिसांकडे परवानगी मिळावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.