लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एमआयडीसीमधील धोकादायक रासायनिक कंपन्या तातडीने हलवल्यानंतर त्याठिकाणी इंजीनियरिंग अथवा आय टी क्षेत्रातील उद्योग सुरू करावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवासी इमारती उभार नका, असा इशारा २७ गाव संघर्ष समितीने गुरुवारी दिला. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने स्फाेट झालेल्या अमुदान कंपनीतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
‘तातडीने मदत करा’
दुर्घटनेतील मृत आणि जखमी कामगारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणी बरोबरच ज्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांनाही तातडीने मदत देण्याची मागणी समितीने केली. समितीने प्रदुषण नियंत्रण यंत्रणा, बाॅयलर, रिअँक्टरचे इन्स्पेक्शन आणि ऑडिट यावर बोट ठेवून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रसंगी गंगाराम शेलार, गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, भास्कर पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय वझे, बाळाराम ठाकुर,रतन पाटील, रमाकांत पाटील, बुधा वझे, बंडू पाटील, जालंदर पाटील, जितेंद्र ठाकुर, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दाेषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी समितीने केली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधितांची भेट घेतली जाईल, असेही समितीने स्पष्ट केले.