मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढली की, शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले. मात्र, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण व कमी असलेला मृत्युदर पाहता कोरोनामुक्तीकडे मनपा प्रशासनासह आरोग्य विभाग व खाजगी रुग्णालयांनी वाटचाल केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी त्यावर ठोस उपचार नसल्याने भीती कायम होती. लस आल्याशिवाय कोणीही निर्धोक होणार नसल्याने सगळ्यांनाच तिची प्रतीक्षा होती. आता ती तयार झालेली आहे.
यानुसार, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम ती दिली जाईल, असे स्पष्ट करून नावनोंदणी सुरू केली आहे. त्याकरिता कोविन सॉफ्टवेअर दिले असून त्यात ती केली जात आहे. यानुसार, मनपाने १०० टक्के नावनोंदणी पूर्ण केली आहे. मात्र, त्यापैकी ९० टक्के लोक लसीकरणासाठी उत्सुक आहेत. उर्वरित १० टक्के डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी भीती आहे. दरम्यान, आम्हाला दुसऱ्या टप्प्यात लस न देता पहिल्या टप्प्यात द्यावी, अशी मागणी पोलीस, सुरक्षारक्षकांनी केली आहे. अनेक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. याचा विचार व्हावा. तसेच काही वयोवृद्धांच्या मते आम्हाला कोरोनाचा संसर्ग लवकर होतो. आमच्यात प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आम्हालाही पहिल्या टप्प्यात लस द्यावी.
पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारीवर्गास लस दिली जाणार आहे. कोविन सॉफ्टवेअरअंतर्गत १०० टक्के नावनोंदणी केली आहे. नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात किती जण लस घेणार, हे लसीकरण सुरू झाल्यावरच समजणार आहे. - डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे कोरोनालढा देण्यासाठी डॉक्टर आर्मी उभी केली गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोनाचा नवा विषाणू स्ट्रेन्स आला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाची लस घेणार आहे. ती घेऊन ते कोरोनाच्या लढ्यासाठी पुन्हा सज्ज होणार आहेत. - डॉ. प्रशांत पाटील, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना लस उपलब्ध झाल्याने ती घेण्याची पहिली संधी आम्हाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे ती आम्ही घेणार आहोत. कोरोनाशी सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. ती नव्हती तेव्हा भीती होती. ती उपलब्ध होत असल्याने जीवात जीव आला आहे. लस घेतल्यावर भयमुक्त सेवा काम करता येणार आहे.