डोंबिवली : केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा सप्टेंबरपर्यंत बँकेतून बदलून मिळतील आणि त्या सध्या व्यवहारात चालतील, असे स्पष्ट केल्यानंतरही डोंबिवली परिसरातील व्यापारी, हॉस्पिटल, पेट्रोलपंप चालक त्या ग्राहकांकडून स्वीकारत नसल्याने सामान्य नागरिकांची कोंडी झाली आहे.
बहुतांश हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातलगांना तसा अनुभव येत आहे. त्यामुळे रुग्णांकडे लक्ष द्यावे की बँकेतून नोटा बदलून आणाव्या, असा पेच त्यांना पडला आहे. जे ग्राहक पेट्रोल पंपावर दोन हजारांची नोट घेऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात गेले, त्यांच्या नोटा स्वीकारल्या, पण आता पेट्रोलपंपावर नोटा स्वीकारत नाहीत.
शहरातील स्कॅनिंग सेंटरमध्ये असाच अनुभव येत आहे. किराणा माल खरेदी करताना दुकानदार दोन हजारांची नोट घेत नाही. बँकांमध्ये नोटा जमा करताना आधी फॉर्म भरून नोटांचे नंबर टाकण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. सराफ व्यावसायिकदेखील दागिने घेताना आधी रोख रक्कम देणार की चेक, अशी विचारणा करून रोख असेल तर दोन हजारांची नोट नको, असे सांगत आहेत.
नोटा स्वीकारताना पॅन, आधार क्रमांक घेतात. त्यामुळे दागिन्यांचा आनंद राहिला बाजूला, पण दोन हजारांच्या नोटा नको, अशी ग्राहकांची अवस्था होते. रेल्वे पास काढतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सप्टेंबर महिना जसजसा जवळ येईल तसा दोन हजारांच्या नोटा शिल्लक असलेल्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे.
टूडी इको काढण्यासाठी खासगी हॉस्पिटलने मला एका स्कॅनिंग सेंटरला पाठविले. त्या ठिकाणी माझे बिल दोन हजार रुपये झाल्याने आम्ही दोन हजाराची नोट दिली. पण त्यांनी ती नाकारली. मोठे बिल असेल, तरच दोन हजारांच्या नोटा घेणार, असे सांगून त्या स्टाफने माझ्याशी हुज्जत घातली. मी आधीच आजारी असून, मला व माझ्या कुटुंबीयांना खूप मनस्ताप झाला.- मनोहर गचके
दोन हजारांच्या नोटा व्यापारी नाकारत आहेत. सप्टेंबरपर्यंत त्या घेणे, तसेच व्यवहारात असण्याला बंदी नाही. मनमानी पद्धतीने व्यापारी वागत असून, सामान्यांना त्याचा त्रास होत आहे.- चेतन तायशेटे, बांधकाम व्यावसायिक