- सचिन सागरेडोंबिवली - जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रोफाईन रीसायकलिंग प्रा. लि. कंपनीतर्फे ई-कचरा संकलन अभियान पूर्वेकडील कामा कार्यालय येथे शनिवार आणि रविवार रोजी राबविण्यात आले आहे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लिमिटेड ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अधिकृत कंपनी आहे. यावेळी, कामाचे चेअरमन देवेन सोनी, प्रेसिडेंट राजू बेलूर, वाईस प्रेसिडेंट दिपक विश्वनाथ, सेक्रेटरी अमोल येवले तसेच इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रा. लि. च्या फाउंडर वैशाली स्वरूप आणि रिजनल हेड आकाश देशमुख आदी उपस्थित होते.
भारत सरकारने या ई-कचऱ्यासंदर्भात काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामध्ये ई-कचरा शास्त्रीय पद्धतीने रिसायकल करणे, त्याची योग्य पद्धतीने आणि योग्य कंपनीतर्फे विल्हेवाट लावणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे नमूद केले आहे. आपल्याकडे जेवढे काही रिसायकल होते त्यातील बराच भाग अनधिकृतरित्या काम करणाऱ्या लोकांकडून चुकीच्या पद्धतीने रिसायकल केला जातो. त्यामुळे वातावरणात बरेच विषारी वायू जात आहेत. बराच कचरा हा पाण्यात जाऊन आपले जलस्त्रोत दूषित होत आहेत. या ई-कचऱ्यात असणाऱ्या हानिकारक पदार्थांमुळे जमीन नापीक होत असल्याची माहिती वैशाली स्वरूप यांनी दिली.