- अनिकेत घमंडीडोंबिवली - गेल्या आठवड्यात तुरळक पडलेल्या पावसाने बुधवार, गुरुवारपासून चांगलीच हजेरी लावली, शुक्रवारी पहाटेपासून पावसाने हजेरी लावून लहान मोठ्या सरींनी दिवसभर शहराला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. गुरुवारी रात्री टिळक रोडवरील अलंकार सोसायटीसमोरील एक झाड पडल्याने पहाटे पाच वाजेपर्यंत ते छाटण्याचे काम महापालिका, अग्निशमन यंत्रणा करत होती. त्या कारणाने काही काळ टिळक पथ येथील वाहतूक वळवण्यात आली होती. पावसाचा जोर कमी अधिक असल्याने रस्त्यावरील वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला होता, हमरस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
मानपाडा रस्ता, एमआयडीसी आदी ठिकाणी कोंडी झाली होती. डीएनसी भागात काही सीसी रस्त्याचे काम सुरू असल्याने तेथेही वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचले होते, पण त्याचा लगेचच निचरही झाला. शाळकरी मुले, ज्येष्ठानी पावसाचा आनंद लुटला. पावसाची सर येताच वातावरण गार झाले होते, पण जोर कमी होताच पुन्हा उकाडा असल्याने नागरिक हैराण झाले होते.
सकाळच्या सत्रात लोकलसेवा वेळेवर धावल्या, मात्र संध्याकाळी २० मिनिटे विलंबाने लोकल सेवा सुरू।होत्या. मुंबई दादर भागातून लोकल लेट आल्याने कल्याण, ठाणे भागातील चाकरमानी त्यामुळे वैतागले होते, परतीच्या मार्गावर गाड्यांना गर्दी झाली होती.