- प्रशांत माने डोंबिवली - मुलुंड, कोनगाव, विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ पोलिस ठाण्यात तब्बल दहा गुन्हे दाखल असलेला आणि गवंडी म्हणून वावरणा-या सराईत गुन्हेगाराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उर्फ बाबु रमेश पवार (वय २५ ) रा. चेंबुर असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात दाखल असलेल्या दहा गुन्हयांपैकी नऊ गुन्हे फसवणुकीचे आहेत. त्याला कोपरी पोलिसांच्या हवाली दिले आहे.
विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन लोखंडे, पोलिस उपनिरिक्षक दिपविजय भवर, पोलिस हवालदार राजेंद्र पाटणकर, राजेश पाटील, शकील जमादार, नितीन भोसले, पोलिस शिपाई शशिकांत रायसिंग, शंकर साबळे व पोलिस मित्र प्रवण केवट हे गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता गस्त घालत होते. डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर दोन व्यक्ती संशयीत हालचाली करताना दिसले. पोलिस त्यांना पकडण्यासाठी धावले असता दोघांमधील एकजण पळून गेला तर दुसरा राहुल पवार याला पकडण्यात यश आले. त्याची चौकशी करता त्याने गवंडीचे काम शोधणेसाठी आला असल्याची माहिती त्याने दिली. संशय आल्याने त्याचा फोटो काढून कोर्ट चेकरवर टाकला असता त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिस खाक्या दाखवताच त्याने त्याच्या साथीदारासह कल्याण, भिवंडी, ठाणे व मुंबई येथे अनेक जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. पवार विरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात सहा, विठ्ठलवाडी येथे दोन तर कोनगाव आणि अंबरनाथमध्ये प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. कोपरी आणि मुलुंड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात पवार फरार होता.