- अनिकेत घमंडी डोंबिवली - मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहर परिसराला झोडपून काढले असून गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी बरसल्या असून दुपारी १२ वाजता जोर आणखी वाढला होता, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोन्ही सत्रातील शालेय विद्यार्थ्यांना जाता येताना पावसामुळे अडथळे आले, स्कुल बसचा वेग मंदावला होता, शहरांतील मानपाडा, टिळकपथ, एमआयडीसी पश्चिमेला म.फुले रोड, सुभाष रोड, दीनदयाळ रोड यांसह कोपर आणि कुंभरखन पाडा आदी भागात वाहतूक मंदावली होती. सुभाष रस्त्यावर खड्डे असल्याने रिक्षा वाहतूक आणि दुचाकींची अडचण झाली होती, नागरिकांना त्याचा।खूप त्रास झाला. ठीकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे डबके झाल्याने वाहनांना खड्याचा अंदाज आला नाही, त्यामुळेही आबालवृद्धांना मार्ग काढताना त्रास झाला. बाजारपेठमध्येही शुकशुकाट पसरला होता, व्यावसायिक सततच्या पावसामुळे ग्राहक नसल्याने चिंतेत होते.
कल्याण मध्येही पूर्वेला चक्कीनाका, तासगाव यांसह तिसाई परिसर आदी भागात पावसाचे पाणी साचले असल्याने तेथे वाट काढताना पादचारी, वाहनचालक आदींना अडथळे आले. शिवाजी चौकात नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडी झाली होती, मार्केट परिसरात वर्दळ होती, परंतु पावसामुळे धंद्याला तेजी नसल्याचे सांगण्यात आले.
स्टेशन परिसरात रिक्षा पकडण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली, अपेक्षित ठिकाणी रिक्षा यायला तयार नसल्याने प्रवाशांची पंचाईत झाली होती.दिसवभर आकाश ढगाळलेले होते.
गेल्या आठवाड्यात वीजा चमकल्या तशा या दोन दिवसात न चमकल्याने नागरिकांना दिलासा।मिळाला, परंतु पावसाचा जोर वाढल्याने खाडी परिसरातील रहिवाशांमध्ये पावसाचे पाणी घरात।शिरते की काय याची चिंता होती, दुपारी 12 पर्यन्तच्या माहितीनुसार खाडी किनारा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.