डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील टाटा पावर परिसरात देशमुख होम्स संकुल आहे. या संकुलात 1350 सदनिका धारक राहतात. मात्र संकुलातील रहिवासी गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने हैराण आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन देखील पाणी येत नाही. केडीएमसी प्रशासन व एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवित आपली जबाबदारी ढकलत आहे.
देशमुख होम्सचे पाणी अनंतम, रिजन्सी या बड्या गृहसंकुलांना बूस्टर पंप लावून वळविण्यात आले असून आम्ही मात्र पाण्यापासून आजही वंचित आहोत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती करण्यात आली आहे. अद्याप त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर येथील स्थानिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासन आता यावर काय उपाययोजना करते ते पहावे लागेल.