डोंबिवली : राज्यात कोळशाची टंचाई भेडसावत असल्याने वीज भारनियमनाची टांगती तलवार असताना कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांची मात्र त्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शहरांमधील सुमारे पाच लाख वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डोंबिवलीतील ग्राहकांचा वीजबिल भरणा करण्यामध्ये राज्यात अव्वल क्रमांक आहे. महावितरणच्या ‘अ’ वर्गात या शहराचा वर्षानुवर्षे समावेश आहे. तर, कल्याण पूर्वेतील मलंगपट्टा वगळता सर्व भाग आणि पश्चिमेकडील भागातही भारनियमन होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. डोंबिवलीत महावितरणचे १ लाख ९० हजार ग्राहक असून, त्यांच्याकडून महिन्याला सुमारे ३० कोटी वीज बिल वसुली होणे अपेक्षित असते. त्यापैकी साधारणपणे सात टक्के ग्राहक वगळता अन्य ९३ टक्के ग्राहक वीज बिल भरणा वेळच्यावेळी करतात. अन्य सात टक्के ग्राहकांचे सुमारे दीड दोन कोटी रुपये वीजबिल अनियमित असते, पण त्याची पूर्ण तूट होत नाही, असेही महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्याने स्पष्ट केले.
कल्याण पूर्वेला २ लाख ७५ हजार, तर पश्चिमेला १ लाख ६० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी पूर्वेतील मलंग पट्ट्यातील सुमारे सात हजार ग्राहकच नियमितपणे वीजबिल भरतात. उर्वरित ग्राहक वीजबिल भरत नसल्याने तेथे वसुलीत मोठ्या प्रमाणावर तूट आहे. त्यामुळे तेथे भारनियमन अटळ आहे. साधारणपणे ५८ टक्क्यांपेक्षा कमी वीजबिल भरणा झाल्यास, ती तूट भरून न निघाल्या कारणाने तेथे भारनियमन होत असल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली हे शहर काही वर्षांपूर्वी वीज बिलांच्या कमी वसुलीमुळे भारनियमन होणारे शहर होते. येथे सात तासांचे भारनियमन केले जात होते. त्यावेळी सरसकट भारनियमन केले जात होते. नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसत होता. परिणामी वीज मिळणार नसेल तर बिल का भरायचे, ही प्रवृत्ती वाढीस लागली होती. राज्य सरकारने भारनियमनाचे वेळापत्रक वीज बिल वसुलीशी जोडल्याने डोंबिवलीकरांना मोठा दिलासा लाभला आहे.
मुरबाडपुढील परिसरातूनही भरणा नाही
- मुरबाडपुढील परिसरातही नियमितपणे वीजबिल भरणा होत नाही. त्यामुळे तेथेही वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या आगामी काळात येऊ शकते, असेही सांगण्यात आले.
- डोंबिवली, कल्याण शहरांप्रमाणे सर्वच ठिकाणच्या ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे आणि वीज खंडित होण्यापासून स्वतःसह कुटुंबाला होणारा त्रास टाळावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.