Dombivli MIDC Blast : डोंबिवलीएमआयडीसीतील अंबर (अमूदान) केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.या घटनेत आत्तापर्यंत ११ निरपराधांचे बळी गेले असून अद्यापही घटनास्थळी मानवी अवशेष सापडत आहेत. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूला रासायनिक कारखान्याला चिकटून राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या स्फोटानंतर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असून कोर्टाने मलय मेहताला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता कोर्टात आरोपीच्या वकिलाने स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत धक्कादायक माहिती दिली.
डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ११ जणांचे मृत्यू झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर दिवसभर शोधकार्य करण्यात येत होतं. मात्र रात्री अचानक पुन्हा कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली होती. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी आणि मलय मेहता यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर कोर्टाने मलय मेहता यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मालती मेहता यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे. मालती मेहता यांच्या पतीच्या निधनानंतर कंपनी मुलाच्या नावावर करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. मात्र सुनावणीदरम्यान,मेहतांच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली.
स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र नंतर स्फोट झालेल्या कंपनीमध्ये कोणताच बॉयलर नसल्याची माहिती पुढे आली. हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. शनिवारी कोर्टात मेहतांच्या वकिलांनी, स्फोटाआधी कंपनीचे मालक देखील तिथे जाणार होते. मात्र त्यांना उशीर झाल्याने ते तिथे पोहचू शकले नाहीत. नाहीतर त्यांच्यासोबतही काहीतरी घडले असते असे सांगितले. हा स्फोट हा वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचे वकिलाने सांगितले. तसेच मेहता यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या आणि सर्व नियमांचे पालन केले होते.
या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणाऱ्या प्रियेश सिंग यांनी ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने सांगितले की तापमान वाढल्यामुळे हा स्फोट झाला. पण तिथले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने काय केल? तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे हे झालं असा आरोप प्रियेश सिंग यांनी केला आहे.