- मुरलीधर भवार
डोंबिवली एमआयडीसीतील अनुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनी मालक मलय मेहता याला चार दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटके पाठोपाठ मलय मेहता याची पत्नी स्नेहा मेहता हिला देखील उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही उद्या कल्याण न्यायालय समोर हजर केले जाणार आहे.
अमुदान कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. तसेच ६४ जण जखमी झाले होते. या घटनेत अनेक मालमत्तांचे नुकसान झाले. शोरूम दुकाने आणि अमुदान कंपनी शेजारी चार कंपन्या बाधित झाल्या. या चार कंपन्यांचे देखील मोठे नुकसान झाले. या प्रकरणी कंपनीचा मालक मलय मेहता याला चार दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपुष्टात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे.उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणी मलय मेहता याची स्नेहा मेहता हिला अटक केली आहे. स्नेहा ही अमुदान कंपनीत भागीदार आहेत. मेहता यांच्या घाटकोपर येथील घरातून स्नेहा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणातील आरोपी कंपनी मालक मलय मेहता याच्यासह आरोपीची पत्नी स्नेहा मेहता हिला कल्याण न्यायालय हजर केले जाणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयात मेहता यांच्या पत्नीला पोलीस कोठडी मिळणार ही की, पती-पत्नी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार हे स्पष्ट होणार आहे. मलय मेहता यांना जेव्हा प्रथमच कल्याण न्यायालय समोर हजर केले होते तेव्हा पोलिसांनी तपास कामासाठी १४ दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने केवळ पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे उद्याच्या सुनावणी कडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.