डोंबिवली: तिसऱ्या दिवशी शनिवारीही संध्याकाळी ४ नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली, वीजांचा थरार बघून नागरिकांनी ठिकठिकाणी आडोसा घेतल्याचे निदर्शनास आले.
येथील भगतसिंग रस्त्यावरील एका इमारतीवर वीज पडली असून त्या इमारतीच्या गच्चीचा एका भागातील कठडा थोडा तुटला असून पत्र्याची शेड देखील तुटल्याचे निदर्शनास आले. त्या घटनेमुळे मात्र त्या इमारतीमधील रहिवासी मात्र घाबरले होते. तेथील विजेचा एक फेज काही काळ खंडित झाला होता, लिफ्ट बंद पडली होती. त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात आले.
पावसाच्या सरींवर सरी पडल्या कोसळल्या. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात भयंकर वीजा चमकल्याने टिळक पथ येथील मंजुनाथ शाळेच्या परिसरातील नागरिकांनी घाबरून एकच आवाज।केला. त्यापाठोपाठ आणखी एक वीज चमकल्याने मोठा आवाज झाला. पावसाचा वेग काही वेळाने कमी झाला असला तरी आकाश ढगाळलेले होते. मेघ गर्जना मात्र सुरूच होत्या. शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांनीही फडके पथ, स्टेशन परिसर आदी ठिकाणी दुकानांमध्ये काही वेळ थांबून पावसाचा जोर कमी होताच मार्गस्थ झाले. एवढा पाऊस पडूनही वातावरणातील उकाडा कायम होता.