डोंबिवली: केडीएमसी हाय हाय, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, डोंबिवलीतील खड्डे जगात भारी, आमच्या टॅक्सच्या पैशांचे झालं काय या ना अशा अनेक घोषणा देऊन, घंटानाद, थाळीनाद करून गुरुवारी रात्री फडके पथ येथील अप्पा दातार चौकात दक्ष नागरिकांनी एकत्र जमून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अस्वच्छता आणि इतर नागरिक समस्याच्या विरोधात डोंबिवलीकर रस्त्यावर उतरला. पूर्वेतील अप्पा दातार चौकात घंटा नाद, थाळी नाद करून महापालिका प्रशासनाचा निषेध त्यांनी केला. विशेष म्हणजे कोणताही राजकीय पक्ष यात सहभागी नव्हता, डोंबिवलीकरांनी उस्फूर्तपणे या आंदोलनात सहभाग नोंदवला. दरवर्षी डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. मग आम्हाला चांगले रस्ते आणि शहरात स्वच्छता का मिळत नाही, असा सवाल उपस्थित करीत महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काही मिनिटे गृहसंकुलांनी दिवे बंद करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी उदय कर्वे, अक्षय पाठक, पुंडलिक पै, नंदू पालकर, राहुल फुलदेवरे, मंदार कुलकर्णी, उदय पेंडसे, गजानन माने, मंगेश काळे, सुरेश फाटक, रसिका जोशी, आदींसह संघ परिवार आणि दक्ष नागरिक सहभागी झाले होते.
दिवे लागलेलेच होते- या आंदोलनासाठी आयोजकांनी दिवे बंद करण्याचे आवाहन केले होते, मात्र फडके पथवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे व्यावसायिक, रहिवासी आदींनी दिवे बंद केले नव्हते.